नाशिक - विधानसभा निवडणुकीमध्ये 240 पेक्षा जास्त जागा आमच्या येतील. तसेच विरोधी पक्ष 40 च्या वर जाणार नाही, असे व्यक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता 18 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे. तर पंतप्रधान मोदी यांची 19 तारखेला सभा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्याचे नियोजन गिरीश महाजन हे स्वतः करत आहेत. त्यासाठी ते नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
लोकांचा महाजनादेश यात्रेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसादाने 240 जागांच्या आकड्यांचा अंदाज वर्तविला आहे. हा आकडा चुकणार नाही आणि विरोधकांना 40 जागांवरचं समाधान मानावे लागेल, असेही महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा - सेनेच्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचे सदस्यत्व रद्द; लाच घेतल्याने कारवाई
- शरद पवारांनी स्वतःच्या मनाची समजूत घालावी -
शरद पवारांकडे आता स्वतःच्या मनाची समजूत घालण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. यामुळे त्यांनी तेवढेच काम करून लवकर निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाही तर आहे तेसुद्धा पक्षात राहणार नाहीत, अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीचा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार? वाचा पवार काय म्हणाले..
- पक्षांतर करणाऱ्यांनी पवारांना अंतःकरणात ठेवून आमच्याकडे यावे -
नाशिकमध्ये मेगा भरती होणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, आमच्याकडे उदयनराजे आले यापेक्षा आणखी मोठे कोण ? असा प्रतिप्रश्न महाजन यांनी केला. विरोधकांकडे आता कोणी मोठे उरलेले नाहीत. पक्षांतर करणायांनी पवारांना अंतःकरणात ठेवावे पण आमच्याकडे यावे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.