ठाणे - गावात रस्ता नसल्याने गावातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांची अंत्ययात्रा 8 फुटाच्या भिंतीवरून गावकरी नेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे, सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या एका सैन्य दलातील जवानाच्या गावातील हे भयाण वास्तव असून आता जवानाने स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीमेवरून रस्त्याच्या मागणीसाठी आर्त हाक दिली आहे. योगेश घावट असे सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे कल्याण तालुक्यातील रायते गावातील रहिवासी आहेत.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अशी केली अटक, बघा VIDEO
- ८ वर्षापासून रस्त्याची मागणी-
कल्याण - मुरबाड रोडवरील कल्याण ग्रामीण भागात रायते गाव आहे. या गावात रस्ता नसल्याने गेली ८ वर्षापासून सैन्य दलातील जवान योगेश घावट, ज्ञानेश्वर घावट यांच्यासह शेतकरी प्रकाश व प्रेम भोईर स्थानिक प्रशासनाकडे मागणी करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या राहत्या घराच्या परिसरात जाणे - येणे साठी रस्ता नसल्यानेही अनेक वर्षापासून वाईट अवस्था आहे. एकीकडे पावसामुळे शेतात चिखल असल्याने शेतातील रस्ता बंद तर दुसरीकडे घरांच्या बाजुला रस्ता अडवून इमारत संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थी, महिलांसह वयोवृद्ध यांना जाणे येणे कसे करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच एखाद्या व्यक्तीचे गावात निधन झाले तर त्यांच्या अंत्ययात्रा शेतातील चिखलातून कशी न्यावी असा प्रश्न दरवेळी स्थानिकांकडून केला जातो.
- स्थानिक प्रशासन गावाच्या रस्त्यांकडे लक्ष देणार का?
गेल्याच वर्षी भारतीय सैन्यातील जवान घावट यांच्या घरात एका सदस्याचे निधन झाले होते. तर त्यांच्या शेजारी राहणारे भोईर नावाचे शेतकरी यांच्याही घरात एकाचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या अंत्ययात्रा भिंत ओलांडून न्यावे लागते, यापेक्षा जास्त शरमेची बाब आपल्यासाठी काय असू शकते असा सवाल जवान घावट यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता तरी स्थानिक प्रशासन या गावाच्या रस्त्यांकडे लक्ष देणार का? असा सवाल गावकरी करत आहेत.
हेही वाचा - नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO