ठाणे - कोरोनाने थैमान घातले असले तरीदेखील भिवंडीतील गुन्हेगारीच्या घटना सुरूच असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. त्यातच भिवंडी तालुक्यातील पोगाव पाईपलाईन शेजारी १ एप्रिलला रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून घटनेचे गांभीर्य ओळखून शिताफीने तपास करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. खळबळजनक बाब या तरुणाची उसनवारीच्या पैशांवरून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सोहेल लालाखान पठाण ( वय १८ , रा. रहमतपुरा शांतीनगर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शाहबाज मोहमद शाकीर अंसारी ( रा. शांतीनगर, आझादनगर ) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृत सोहेल हा भिवंडीतील रहमतपुरा शांतीनगर परिसरात राहत होता. तो नशेच्या आहारी गेल्याने त्याला पैशांची चणचण भासायची. त्यामुळे त्याने आरोपी मित्र शाहबाज याच्याकडून दीड महिन्यांपूर्वी २० हजार रुपये उसने घेतले होते. याच पैशांवरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे १ एप्रिलला मृतक सोहेलला आरोपी शाहबाजने बाहण्याने भिवंडी तालुक्यातील पोगाव पाईपलाईन शेजारी घेऊन गेला होता. याठिकाणी सोहेल याच्या पोटावर, डोक्यावर व गाळ्यावर धारदार सूऱ्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून जागीच ठार मारले आणि घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली नसल्याने मयताच्या ओळखी बरोबरच अज्ञात आरोपींच्या मुसक्या अवळण्याचे दुहेरी संकट तालुका पोलिसांसह गुन्हे विभागासमोर होते.
तालुका पोलिसांसह मुरबाड व शहापूर गुन्हे शाखा पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी तयार करण्यात आली होती. त्यांनतर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती. मृताने आरोपीकडून उसने पैसे घेतले होते. या आधारावर पोलिसांनी आरोपी शाहबाज अंसारी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली, असता मयत सोहेल याने उसने घेतलेले पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ केली होती. या गोष्टीचा राग धरून शाहबाज याने सोहेल यास भेटायला बोलावून पोगाव येथील पाईपलाईन जवळ घेऊन जाऊन सोहेल याच्या पोटावर, डोक्यावर व गाळ्यावर धारदार सुऱ्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून जागीच ठार मारल्याची कबुली शाहबाजने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी तथा तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे.