नवी मुंबई - हर्बल लाईफ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची बनावट कागदपत्रे, शिक्के, लेटरहेड, धानादेश आणि सह्या करून कंपनीची 4 कोटी 10 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना गजाआड केले आहे. शिवाय यामागे आणखी कोणी आहे की, नाही याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हर्बल लाईफ इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीचे आयसीआयसीआय बँकेत खाते होते. एका अनोळखी व्यक्तीने संबधित कंपनीचे बनावट लेटरहेड तयार केले. त्यावर कंपनीचे रबरी शिक्के मारून खोट्या सह्या केल्या. त्यानंतर संबधित कंपनीच्या नावाने बँकेत असलेला मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी कंपनीच्या नावाचे खोटे लेटरहेड बँकेत दिले. कंपनीच्या खात्यातील 4 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम आर. के. इंटरप्राईज यांच्या इन्ड्सइंड या बँकेतील खात्यात वळती केली. हर्बल लाईफ इंटरनॅशनल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरक्षक ईशान खरोटे, निलेश राजपूत यांनी बँकेच्या विविध खात्यांची तपासणी केली. तसेच मुंबई, पनवेल, ठाणे व इतर ठिकाणी सापळे लावले. यावेळी रामकिशन पांडे(51) उल्हासनगर, अमित मित्रा (61)सांताक्रूझ, आरफत शेख(33)नेरुळ, विनोद भोसले (44)कळंबोली, जावेद कुरेशी(55)मुंबई, श्रीजल कुरपमबिल (39) डोंबिवली, मुकेश गुप्ता(45) घणसोली या सात जणांना अटक केली. गुन्हा घडलेल्या पनवेलमधील आयसीआयसीआय बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असल्याचा पोलिसांना संशय आला होता. त्या अनुषंगाने बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली होती.
बँकेच्या कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याशिवाय हा गुन्हा होऊ शकत नाही हे तपासादरम्यान पुढे आले. त्यामुळे आरोपींना बँकेच्या खात्याबाबत सर्व गोपनीय माहिती दिल्याने हा गुन्हा करणे आरोपींना शक्य झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याची उकल केल्यामुळे आरोपींनी वळती केलेली 4 कोटी 10 लाख रुपये रकमेपैकी 4 कोटी 6 लाख रुपये रक्कम इंड्सइंड बँकेत फ्रीज करण्यात आली आहे.