नवी मुंबई - एचपीसीएल कंपनीच्या पाईपलाईनमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.
एचपीसील कंपनीच्या नवी मुंबई व पुणे दरम्यान असणाऱ्या पाईपलाईनमध्ये सप्टेंबर महिन्यात कमी दाबाने डिझेल येत होते. याबाबत कंपनीने त्या ठिकाणी गस्त नेमली होती. त्या गस्तीदरम्यान 27 सप्टेंबरला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तुर्भे पुलाजवळ पाईपलाईन जवळ हालचाल दिसून आली. गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सानपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे देशमुख व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना पाईपलाईनला छिद्रे पाडून लोखंडी व्हॉल्व्ह बसविलेला दिसला. त्यातून पेट्रोलची चोरी करण्यात येत होती. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा-पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर प्रवाशाला मारहाण करून लुबाडणारे चोरटे जेरबंद
तांत्रिक तपासाद्वारे सापळा रचून आरोपीला घेतला ताब्यात
तांत्रिक तपासाद्वारे 15 नोव्हेंबरला मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून भोलाप्रसाद यादव याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन त्याचे साथीदार बलदेव सिंग, जितेंद्र यादव व केशव शेट्टी यांची माहिती पोलिसांनी घेतली. ते सानपाडा ब्रिज जवळ येणार असल्याची माहिती संबधित आरोपीने त्यांना दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम, पोलीस निरीक्षक गुन्हेचे देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस हवालदार पानसरे, पोलीस नाईक नार्वेकर यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने संबधित गुन्हे केल्याची माहिती दिली. संबधित चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेला टँकर, मोबाईल फोन व गुन्हा करीत असताना वापरलेले साहित्य मिळून 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा-यावल शहरातील शेतमजुराची फसवणूक; ३१ हजारासह नववधूचा पोबारा
चोरीचे डिझेल खरेदी करणाऱ्या व्यक्तीला बुलडाणा येथून ताब्यात-
चोरी केलेले डिझेल हे आरोपीने चिखली बुलढाणा येथील बायो डिझेल पंपाचे मॅनेजर भास्कर सकपाळ यांना विकल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनाही बुलढाणा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. सानपाडा पोलिसांच्या माध्यमातून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे नवी मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.