ठाणे - भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथे जिलानी इमारत कोसळल्याची घटना २१ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत ३८ नागरिकांचा मृत्यू, तर २३ रहिवासी जखमी झाले होते. या प्रकरणी इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकासह मनपाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त, तसेच बिट निरीक्षक व लिपिक या चौघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - अंबरनाथ : रिपाईच्या माजी शहराध्यक्षाची तहसीलदाराला गोळ्या घालण्याची धमकी
अटक कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसह या अवैध बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या मनपाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुदाम नारायण जाधव यांच्यासह तत्कालीन बिट निरीक्षक सुनिल सिताराम वगळ, भूभाग लिपिक प्रफुल्ल प्रकाश तांबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जिलानीच्या बांधकाम विकासकाला ५ महिन्यानंतर बेड्या...
दुर्घटनेत ३८ जणांचा बळी घेणाऱ्या जिलानी इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे अवैध बांधकाम केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक मोहमंद मुख्तार गुलाम रसूल फंडोले (वय ७६ वर्षे) याच्यावर विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल त्यावेळी केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून फंडोले फरार झाला होता. तसेच, त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याचा शोध घेऊन नारपोली पोलिसांनी त्यास काल अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सहाय्यक आयुक्तांसह दोन कर्मचाऱ्यांना न्यायलयीन कोठडी...
या दुर्घटनेची सखोल चौकशी केली असता, या प्रकारणात भिवंडी निजामपूर शहर महानगरपलिकेच्या प्रभाग समिती ३ चे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुदाम नारायण जाधव यांच्यासह तत्कालीन बिट निरीक्षक सुनिल सिताराम वगळ, भूभाग लिपिक प्रफुल्ल प्रकाश तांबे यांचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आज मनपाच्या या तीनही कर्मचाऱ्यांना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. आज या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली. सदर गुन्ह्याचा तपास भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, नारपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी हे करीत आहे.
मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना ३ लाखांची नुकसान भरपाई...
या दुर्घटनेबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री, तसेच देशातील सर्वच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केले होते. काल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ३ लाखांची नुकसान भरपाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केली. मुख्यमंत्र्यांच्या निधी मंजुरीनंतर या दुर्घटनेस जाबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित होत असतानाच, नारपोली पोलिसांनी सहाय्यक आयुक्तांसह चौघांना अटक केली.
हेही वाचा - भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना तीन लाखांची मदत