नवी मुंबई - दिवसा ढवळ्या चोरी करून नवी मुंबई शहरात भीती पसरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रबाळे एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 22 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिवसा ढवळ्या मारहाण लुटमार करून आरोपी फरार
10 जून एका कंपनीत काम करणारे प्रणय लांबे हे त्यांच्या कंपनीची काही रक्कम घेऊन आपल्या मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञात तिघांनी प्रणय लांबे यास मारहाण करुन त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग घेऊन लंपास झाले होते. या प्रकरणी लांबे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाख झाल्यानंतर पोलिसांनी कंपनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्याच कंपनीतील कामगार सूरज निर्मल हा प्रणय लांबे यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यानंतर सूरजला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने चोरीची कबूली दिली. त्याच्याकडून 82 हजार रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, असा 1 लाख 22 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तीन मित्रांनी केली होती गुन्ह्यात मदत
आरोपी सूरज रामसजीवन निर्मल (वय 23 वर्षे) याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य तीन मित्रांचाही पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. कुलदीपसिंग वीरेंद्र सिंग (वय 26 वर्षे), कौशल सोनपाल वाल्मिकी (वय 26 वर्षे) आणि राजेश राजाराम यादव (वय 26 वर्षे, सर्व रा. भीमनगर झोपडपट्टी, रबाळे), अशी त्यांची नावे आहेत.
हेही वाचा - मनाई असतानाही मुंब्रा बायपासवरील धबधब्यावर नागरिकांनी केली प्रचंड गर्दी...पाहा व्हिडिओ