ठाणे - कल्याण लोहमार्ग पोलिसांना महागड्या मोबाईलचे घबाड 4 आरोपींकडून जप्त केल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 35 लाख किमतीचे विविध कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी मोबाईलचा मोठा साठा हस्तगत केला. कल्याण ते वालधुनी मार्गातील शहाड फटका पॉईंट येथे रेल्वे सुरक्षा बलाचे 2 जवान गस्त घालत असताना कल्याण दिशेकडून 4 संशयीत कल्याण ते वालधुनी या ठिकाणी रेल्वे रूळावरून चालत येत होते. संशय आल्यामुळे जवानांनी या चौघांना विचारणा केली असता उडवाउडवी उत्तर दिली. संशय अधिकच दाटल्यामुळे सुरक्षा बलाच्या जवानांनी या चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडील जम्बो बॅगमध्ये मोबाईलचा मोठा साठा आढळून आला. ताब्यात घेतलेली बॅग तपासली असता त्यात नोकिया कंपनीच्या 7.2 व 8.1 या मॉडेल नंबरचे 204 मोबाईल आढळून आले. एका मोबाईलची किंमत अंदाजे 18 हजार 500 रूपये इतकी आहे. हे सर्व मोबाईल कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 35 ते 36 लाख एवढी आहे. हे मोबाईल या चौकडीने कोठून आणि कशासाठी आणले याची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक शेख, सहायक पोलीस निरीक्षक भिंगर्दीवे व फौजदार पारधे करत आहेत.
हेही वाचा - ठाण्यात व्यापाऱ्याकडून 3 लाखाची खंडणी मागणारे पाचजण अटकेत