ठाणे - शिवजयंतीचे औचित्य साधून अंबरनाथ शहरातील विद्यार्थांनी कागदी लगद्यापासुन राज्यातील २७ किल्यांचे प्रदर्शन आयोजित केले. विशेष म्हणजे सुहासिनी अधिकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः हे किल्ले बनवले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात शिवकालीन काळात उभारलेल्या सिंधुदुर्ग, शिवनेरी, राजगड, तोरणा, प्रतापगड यासारखे २७ किल्ले ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी उभारले. विशेष म्हणजे हे सर्व किल्ले कागदी लगद्यापासुन बनवण्यात आले. तसेच प्रदर्शनातील विविध किल्यांची माहिती विद्यार्थ्यांनी स्वतः संकलित केली. तर प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहितीही किल्ले उभारणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली. दोन दिवस चालणाऱ्या या किल्याचे प्रदर्शन अंबरनाथमधील इतरही शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहता येणार असल्याची माहिती शिक्षिका सूचिता सकपाळ यांनी दिली.