ठाणे : भिवंडी निजामपूर महापालिकेच्या २०१९ साली महापौर पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या कॉंग्रेसच्या बंडखोर १८ नगरसेवकांवर कारवाई करण्यास विलंब केल्याचा आरोप माजी महापौर जावेद दळवी यांनी केला आहे. तत्कालीन कॉंग्रेसच्या मंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचे नगरसवेक पद रद्द करण्यासाठी तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला, असे दळवी यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी : विशेष म्हणजे त्यावेळी महाविकास आघाडीत तत्कालीन महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात होते. त्यांचे नाव न घेता त्यांना शक्तिमानची उपाधी देऊन त्यांच्यावर दळवी यांनी निशाणा साधला आहे. शिवाय त्या १८ बंडखोर नगरसवेकांनी पक्षाचा बनावट व्हीप त्यावेळी तयार करून कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या पारड्यात मतदान टाकले होते. ते केवळ आर्थिक देवाणघेवाण, पदासाठी यांनी कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी केल्याची खरमरीत टीका याचिकाकर्ते तथा कॉग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी बंडखोरांवर केली आहे.
६ वर्ष निवडणूक लढविण्यास मनाई : महाविकास आघाडी असलेल्या तीन पक्षात कॉंग्रेसही सहभागी होऊन राज्यात सत्ता मिळवली. मात्र, आमची सत्ता राज्यात असतांनाही आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकला नाही. उशिरा का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडोखोर नगसेवकांच्या विरोधात निकाल दिला. तसेच त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास मनाई आदेश दिले आहेत. त्या आदेशाने मला खरा न्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून मी त्यांचा आभारी असल्याचे माजी महापौर दळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
कार्यालयाबाहेर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी : बंडखोर नगसेवकाच्या विरोधात निर्णय आल्याने आज दुपारी भिवंडी शहरातील महापालिका मुख्यालया समोरच असलेल्या कॉंगेस जिल्हा कार्यलयात माजी महापौर दळवी यांनी प्रमुख जिल्हा पदाधिकाऱ्यासह पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतर आनंद उत्सव साजरा करत कार्यलयाबाहेर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.