ठाणे - मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील खर्डी - उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत असलेल्या जंगल परिसरात भीषण आग लागल्याने वणवा पेटला. त्यामुळे आगीचे लोळ रुळांवर येत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. विशेष म्हणजे रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने वनवा पेटल्याने, अर्धातास रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक ठप्प
जगंलात अचानक वणवा पेटल्याने आगीचे लोळ रेल्वे रुळापर्यंत पोहोचत होते, त्यामुळे कल्याण कसारा मार्ग अर्धा तास बंद ठेवण्यात आला होता. अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आगीमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक 25 मिनिटाने कोलमडले आहे. दरम्यान आगीवर काहीप्रमाणात नियंत्रण मिळवल्यानंतर, रात्री 9 च्या सुमारास वाहतूक पुर्ववत करण्यात आली. मात्र अद्यापही आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आले नसून, या वणव्यात वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेची नोंद खर्डी वनाधिकाऱ्यांच्या वतीने कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.