ठाणे - आपल्या बहिणीशी बोलत असल्याचा राग मनात ठेवून चार साथीदारांच्या मदतीने मित्राचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सूत्रधार आरोपीने महिलेच्या आवाजात बोलून तब्बल 8 महिने झुलवत ठेवून अंबरनाथच्या जगंलात बोलावून मित्राला एका गाळ्यात हातपाय बांधून बंदी केले. त्यांनतर सुटका करणासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागणी करून तब्बल 3 दिवस कोंडून ठेवले. मात्र, नारपोली पोलिसांना मोठ्या शिताफीने अपहरणकर्त्या पाच जणांच्या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे.
मोहम्मद शकील खान असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शगीर अब्दुल रेहमान चौधरी (वय 24 वर्षे, रा. उल्हासनगर), वसीम इसरार खान (वय 22 वर्षे, रा. ग्रीनपार्क, पुणे), अब्दुलकलाम अब्दुलसलाम खान (वय 22 वर्षे, रा. उल्हासनगर), वसीउल्लाह सीताबउल्ला खान (वय 22 वर्षे, रा. अंबरनाथ) व स्वाती सीताराम माळी (वय 27 वर्षे, रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सलमान (रा. कोंढवा, पुणे) हा फरार असून नारपोली पोलीस त्याचा शोध आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मोहम्मद शकील खान हा चप्पल बनविण्याच्या कारखान्यात काम करीत होता. दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कामावरून घरी न परतल्याने शकीलची पत्नी आस्मा हीने नारपोली पोलिसांकडे दि. 6 फेब्रुवारी रोजी पती बेपत्ता झाल्याची तक्रर दिली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी पत्नीच्या मोबाईलवर फोन करून सुटकेसाठी अपहरणकर्ते 15 लाखांची मागणी करीत असल्याचे पती शकील याने तिला सांगितले.
त्यामुळे पत्नीने पुन्हा नारपोली पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वी. कलम 364 (अ), 387, 120 (ब) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा नोंदवून पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अंबरनाथ येथील वस्सीउल्लाह सिताबउल्ला खान यास ताब्यात घेतले. त्याने शगिर व त्याचे साथीदार यांनी अंबरनाथ येथील एक बंद गाळ्यात शटरला कुलूप लावून त्यामध्ये शकील याचे हातपाय बांधून बंदी बनवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांनतर पोलीस पथकाने स्थानिक अग्निशामक दलाच्या मदतीने त्या गाळ्याचे शटर उघडून मोहम्मद शकील खान याची सुटका केली.
दरम्यान, मुख्य आरोपी शगिर अब्दुल रहमान चौधरी हा एक वर्षा पूर्वी अपहरण केलेल्या शकीलच्या हाताखाली काम करत होता. त्यावेळी शकील आपल्या बहिणी सोबत बोलत असल्याच्या संशयावरुन त्यांच्यात वाद होता. त्यानंतर शगिर चौधरी याने काम सोडले. परंतु, आपला मित्र वसीम यास शमा या बनावट महिलेच्या नावे शकील सोबत तब्बल 8 महिने व्हाट्सअप्पवर चॅटिंग करावयास सांगून गोडगोड बोलून त्यास भेटीसाठी बोलावले. मात्र, त्याच्या समोर महिला दिसावी म्हणून आपल्या परिचयाची आरोपी स्वाती माळी हिची मदत घेऊन ती शकील यास भेटली. त्यानंतर पुन्हा 5 फेब्रुवारी रोजी भेटीस बोलावले असता कल्याण येथून भेटीनंतर अंबरनाथ येथील जंगलात शकीलला स्वाती घेऊन गेली. तेथे आगोदरच पाळत ठेवून असलेले आरोपींनी त्याचे हातपाय बांधून अपहरण केले होते. पोलिसांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी, पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस हवालदार बोडके, सोनावणे,पोलीस नाईक गावडे, सहारे, पोलीस शिपाई ताटे, सोनावणे, बाविस्कर, शिंदे, गलांडे या पथकाने केली.
हेही वाचा - निवृत्ती महाराज वक्ते यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल