ठाणे: भारताला नेमबाजी या क्रीडा प्रकारात मोठी परंपरा लाभली असून अभिनव बिंद्रापासून सुरू झालेला पदक जिंकण्याचा प्रवास राज्यवर्धन राठोड सारख्या अनेक नेमबाजानी पुढे चालू ठेवला. आता याच महान खेळाडूंच्या पंक्तीत बसण्याचा मान ठाण्याच्या रूद्रांक्ष पाटील या 17 वर्षीय युवकाने मिळवला असून 'गोल्डन टारगेट' हा अत्यंत प्रतिष्ठित किताब मिळवणारा तो पहिलाच भारतीय नेमबाज ठरला आहे.
खेळाडूवर दणदणीत मात: इजिप्त देशाची राजधानी कैरो येथे पार पडलेल्या प्रेसिडेंट कप संपूर्ण जगातील 12 अव्वल नेमबाजांना आमंत्रित करण्यात आले होते. रुद्रांक्ष याने सुरुवातीपासूनच आपला खेळ उंचावत उपांत्य फेरीमध्ये ऑलिंपिक विजेत्या खेळाडूवर दणदणीत मात केली आहे. अंतिम फेरीत त्याची गाठ इटलीच्या डॅनिला सोलर्जो बरोबर पडली. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये रुद्रांक्ष याच्यासमोर सोलर्जो याचेच मोठे आव्हान होते.
आपली जागा देखील निश्चित केली: यावेळी मात्र रुद्राक्ष याने आपली कसरत पणाला लावत सोलर्जो याच्यावर १६-१० अशा गुण फरकाने मात करत गोल्डन टार्गेट हा 'किताब आणि १५००० डॉलर्सचे बक्षीस पटकावले. महत्त्वाचं म्हणजे रुद्राक्ष याने अतिशय कमी वयामध्ये आपल्यातील गुणांची चमक दाखवत आगामी ऑलिंपिक स्पर्धेसाठी आपली जागा देखील निश्चित केली आहे. रुद्राक्ष याचे वडील बाळासाहेब पाटील हे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असून त्यांनी आपल्या मुलाच्या यशासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आपले या देदीप्यमान यशामागे आपल्या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, आपले प्रशिक्षक आणि कुटुंबीयांचा मोठा हात असल्याचे मनोगत रुद्रांक्ष याने व्यक्त केले आहे.
आई वडिलांनी दिली प्रेरणा: रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याचे वडील हे आयपीएस अधिकारी आहेत, तर आई परिवहन विभागात उच्च पदस्त अधिकारी आहेत आई वडिलांनी घडवल्या प्रमाणे रुद्रांक्षच्यां आवडीनुसार त्याने लहानपणी या नेमबाजीला सूरवात केली. मात्र काही दिवसांनी मन लागत नसल्याने त्याने 6 महिन्यांचा ब्रेक देखील घेतला. मात्र आई वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तो पुन्हा या खेळाकडे वळला आणि जागतिक कीर्ती प्राप्त केली आहे.
शाळेला आहे रुद्रांक्षचा अभिमान: रुद्रांक्ष शिकत असलेल्या ठाण्यातील नामांकित अशा सुलोचना देवी सिंघानिया शाळेने सुरवातीपासून रुद्रांक्षला सहकार्य केले होते. सराव आणि परीक्षा देखील त्याला अनुसरून घेण्यात आल्या आणि रुद्रांक्ष जागतिक स्तरावर नाव लौकीक मिळवू शकला. या यशात शाळेचे देखील मोठे योगदान असल्याचे रुद्रांक्ष सांगत आहे.
ऑलिंपिक गोल्ड मेडल आहे पुढील लक्ष: रुद्रांक्षने आता आपले लक्ष भारताची मान उंचावण्यासाठी केंद्रित केले आहे. भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यासाठी आवश्यक ते खडतर प्रयत्न आणि सराव देखील तो करत आहे. त्यासाठी त्याचे शिक्षक देखील मेहनत घेत आहेत.