ठाणे - जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच, भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले काल्हेरचे शिवसेना शाखा प्रमुखावर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात शुटरने हा गोळीबार केल्याने भिवंडी तालुक्यात खळबळजनक उडाली आहे.
याप्रकरणी दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. दिपक म्हात्रे असे शिवसेना शाखा प्रमुखाचे नाव असून ते गोळीबाराच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हा प्रकार त्याच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार !
ग्रामपंचायत निवडणुकीत काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे हे उमेदवार आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी येत असताना अचानक यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिव्हल्व्हरने तीन वेळा गोळीबार केला. मात्र सुदैवाने या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले आहे. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोघा अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या वादातून गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांच्या तपासानंतर सर्व प्रकार समोर येणार आहे.