ठाणे : ठाण्यात चार ते पाच शूटर विरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला असता, मुख्य शूटरला गुजरातच्या सुरतमधून तर दुसऱ्याला नाशिकच्या सिन्नरमधून तर एकाला उल्हासनगर मधून बेड्या ठोकल्या आहेत. दिलावर हरी चव्हाण (वय २२) मनोज महेश गुप्ता (वय १९) गणेश गंगाराम मेरूकर (वय २४) असे अटक केलेल्या शूटरची नावे आहेत.
नरेश सेठ को जानसे मार देंगे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर कँप नंबर ५ च्या प्रभाराम मंदिराशेजारी भाजप पदाधिकारी नरेश रोहरा यांचे कार्यालय आहे. ९ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास चार तरुण रोहरा यांच्या कार्यालयाजवळ आले. त्यापैकी एकाने जबरदस्तीने त्यांच्या कार्यालयात घुसून तुमच्या शेठला भेटायचे आहे, असे सांगितले. मात्र अंगरक्षकांनी त्या तरुणाला बाहेर काढले. परंतु त्या अनोळखी इसमांनी अंगरक्षाकांना धक्काबुक्की केली. त्यावेळेस अंगरक्षकांनी त्यापैकी एकाच्या कमरेस तपासले असता त्याच्याकडे एक चॉपर मिळाला. म्हणून अंगरक्षकांनी त्यास पकडून पुन्हा कार्यालयाबाहेर नेत असताना तीन अनोळखी शूटरनी जवळ असलेल्या १ गावठी कट्टा व २ पिस्टल अंगरक्षाकांवर रोखून "नरेश सेठ को जानसे मार देंगे" अशी धमकी दिली. त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून अंगरक्षकांनी देखील शूटरच्या दिशेने गोळीबार केल्याने चारही शूटर घटनास्थळावरून पळून गेले.
आरोपींमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश : याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अनोळखी चार शूटर विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला. यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस पथकाने समांतर तपास सुरू केला. १० जुलै रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने यातील आरोपी असलेला एक अल्पवयीनालाही श्रीराम चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करून इतर आरोपींबाबत माहिती प्राप्त करण्यात आली.
तिन्ही शूटर्सला सापळा रचून अटक : त्यानंतर आरोपीचा तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या अनुशंगाने हिललाईन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी सपोनि पडवळ व पथक यांनी गुजरातमधील सुरत येथून आरोपी शूटर दिलावरला सापळा रचून अटक केली. यानंतर नाशिकमधील सिन्नर मधून शूटर मनोज गुप्ताला अटक केली. तर तिसरा शूटर गणेश गंगाराम मेरूकर याला २० जुलै रोजी उल्हासनगर शहरातून बेड्या ठोकल्या.
मुख्य शूटर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार : या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एस. डेरे करीत असून आज अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यातील मुख्य शूटर दिलावर याच्याविरुद्ध विविध १० पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती एसीपी सुरेश वराडे यांनी दिली आहे. दरम्यान, अटक शूटर हे कुठल्या गँगशी संबंधित आहेत का? त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर गोळीबार का केला? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा: