ठाणे : कल्याण-भिवंडी मार्गावरील साईबाबा बाबा मंदिरानजीक अरिहंत सिटी नावाने मोठे गृह संकुल आहे. या संकुलमधील बी विंग या टोलेजंग इमारतीच्या डग मधील विद्युत वायरीमध्ये अचानक आज दुपारच्या सुमारास शॉकसर्किट झाले. यानंतर संपूर्ण इमारतीमध्ये धुराचे लोट पसरले होते. शिवाय इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरातील विद्युत बोर्डमध्येही शॉकसर्किट होऊन वायरीने पेट घेतला त्यामुळे संपूर्ण घरातही धूर पसरल्याचे पाहून रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. मात्र इमारतीच्या बाहेर पडण्यासाठी घराचे दार उघडले असताना बाहेरील धुराचे लोट घरात घुसत होते. हे पाहून नागरिकांनी घरातील गॅलरीत तर काही रहिवाशांनी इमारतीच्या टेरिसवर पळ काढून मदतीसाठी आरडाओरड केली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश : या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या कार्यालयात मिळताच घटनास्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या दाखल होऊन तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीवर नियंत्रण मिळविल्याने धुराचे लोट कमी झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या २० ते २५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. विशेष म्हणजे, संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरल्याने रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सध्या भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
वीजपुरवठा खंडित: या आगीच्या घटनेमुळे संपूर्णं भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान तीन ते चार तासांचा अवधी लागू शकतो, असेही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
ठाण्यात फटाक्यांमुळे आग: ठाण्यात 2022 मध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना फटाक्यांमुळे 16 आगेच्या घटनांची ठाणे शहरामध्ये नोंद झाली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनी दिवाळी सण मोठ्या उत्साहात राज्यभरात साजरा करण्यात आला. निर्बंध हटवल्यामुळे प्रत्येक जण दिवाळी सण उत्साहात साजरा करताना दिसून येत होता. सर्वच जण उत्साहात फटाके फोडताना देखील जागोजागी दिसत होते. मात्र याच फटाक्यांमुळे 16 ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची शहरामध्ये नोंद झाली.
हेही वाचा: Gautami Patil : 'लोककलेची गौतमी करू नका, अन्यथा..', तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली खंत