ठाणे - डोंबिवलीच्या कल्याण-शिळ रस्त्यावरील सोनारपाडा परिसरातील भंगार गोडाऊनमध्ये आग लागून स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे. या आगीचे कारण अस्पष्ट असून आग लागल्यानंतर स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या दोन गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. सध्या आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काहीच वेळात आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले आहेत. आगीची भीषणता इतकी आहे की, संपूर्ण परिसरात लोट पसरत आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
भिवंडीत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होईल अशी परिस्थिती टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू आहे. यानंतरच आग लागण्याच्या मुख्य कारणाचा खुलासा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फातिमानगरमध्ये कपड्यांचे गोदाम जळून खाक; लाखोंचे नुकसान..
भिवंडी शहरात रात्री सुमारास भीषण आगीची घटना घडली. फातिमानगर परिसरातील एका कापड गोदामाला बुधवारी पहाटे एकच्या सुमारास ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि तीन टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन तासांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले फातिमानगर हा दाट वस्तीचा परिसर आहे. या परिसराच्या मधोमध असलेल्या कापड गोदामाला आग लागली होती. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंतच लाखो रुपयांचे कापड आणि धाग्याचे कोम जळून खाक झाले. दाटीवाटीच्या वस्तीत असा प्रकार पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
17 नोव्हेंबर : कल्याणच्या हायप्रोफाईल इमारतीमधील घराला भीषण आग; जीवितहानी नाही
कल्याण पश्चिम परिसरातील एका हायप्रोफाईल इमारतीमधील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र, वेळेतच अग्निमशन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली.
कल्याण पश्चिम भागात गोदरेज हिल परिसरात टेकडीवर कॅसोरीन नावाची हायप्रोफाईल इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. या फ्लॅटमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली. खळबळजनक बाब म्हणजे आग लागली त्यावेळी काही सदस्य घरामध्येच होते. या आगीने काही वेळातच भीषण रुप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले होते.
या आधीही भिवंडीतील एका कपड्याच्या गोदामाला लागली होती आग
भिवंडीतील राहनाळ गावात बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाऊंड येथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे धाग्यांचे कोम जळून खाक झाले. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर दोन तासात आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. संबंधित गोदामाच्या बाजूलाच थोड्या अंतरावर पेट्रोल पंप आहे. मात्र, वेळेत आग विझल्याने मोठा अनर्थ टळला.