ठाणे - घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांमध्ये लागलेल्या आगीत 22 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले असले, तरी ही आग समाजकंटकानी लावली असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
हेही वाचा... 'तमाशामध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी, त्यातच पोलीसही पैसे मागतात; मग लोककला जिवंत कशी राहणार?'
घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-2 चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेने येथील झोपड्यांना नोटीस बजावली आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी झोपड्यांना अचानक आग लागली.
हेही वाचा... मध्यप्रदेशात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू, १५ जखमी
आगीत त्या झोपड्यांमधील दोन स्टोव्ह आणि दोन सिलिंडरचे स्फोट झाले. या आगीमुळे तेथील जवळपास 22 हुन अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. ही आग लागली की, लावली गेली याचे गूढ अद्याप उकलले नाही. मात्र, येथील रहिवाशांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. या आगीमुळे गोरगरिबांचे संसार खाक झाल्याने शुक्रवारी रात्री ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाने स्थानिक नगरसेवकांच्या आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने निर्वासित झालेल्या रहिवाशांना रात्रीचे भोजन उपलब्ध करून दिले.
हेही वाचा... खळबळजनक! चक्क दारूसाठी काढले रुग्णाच्या शरीरातून रक्त; सायन रुग्णालयातील प्रकार
घोडबंदर येथील या जळीतकांडाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कासारवडवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. तुर्फेपाडा येथील रहिवाशांनी, ही आग कोणी एका समाजकंटकांनी लावल्याचा आरोप केला. तो व्यक्ती येथील रहिवाशांकडून दरमहा भाडेदेखील घेत होता. मात्र, रहिवाशांनी भाडे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने झोपड्यांना आग लावल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. तसेच, या समाजकंटकांवर अॅट्रोसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी अमोल पाईकराव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.