ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी(15 ऑक्टोबर) रात्री उशिरा फर्निचर गोदामासह कारखान्याला भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ४ ते ५ अग्निशामक गाड्या जवानांसह घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अखेर सकाळी 5 वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीत 30 ते 40 दुकाने भस्मसात झाली असून यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती आहे. ठाणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांचे आणि ठाणे महानगर पालिकेच्या RDMC च्या जवानांचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
आगीवर मिळवले नियंत्रण -
भिवंडी-ठाणे मार्गावर भिवंडी तालुक्यातील कशेळी टोल नाक्यानजीकच महालक्ष्मी फर्निचर नावाचे मोठे शोरूम आणि कारखाना आहे. आज रात्रीच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली होती. ही आग लाकडी फर्निचर असल्याने काही क्षणातच गोदाम, कारखाना लगतच्या दुकानांध्ये पसरली. या आगीत आतापर्यत लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. तर आग एवढी भीषण होती की, यामुळे 30 ते 40 दुकाने भस्मसात झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
हेही वाचा - छत्तीसगडमध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान कारने भाविकांना चिरडले; 1 ठार, 20 जखमी... पाहा VIDEO