ठाणे : भिवंडीत गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याचे सत्र सुरू असून आज पुन्हा एका कापड गोदामाला आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना भिवंडी तालुक्यातील नरपोली हद्दीत घडली. आग लागली त्यावेळी या ठिकणी कामगार हजर नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या आगीमुळे गोदामातील कापड जळून खाक झाले.
अनलॉकमुळे भिवंडीतील सर्वच गोदामांसह हजारो कारखाने सुरू करण्यात आहेत. गेल्या महिन्याभरात लहान मोठ्या आगीच्या ६ ते ७ घटना भिवंडी तालुक्यात घडल्या. आज साडेदहाच्या सुमाराला नारपोली गावाच्या हद्दीत असलेल्या कापड गोदामाने अचानक पेट घेतला. गोदामात कपडा असल्याने आगीने लगेचच भीषण रूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक पाण्याचे टँकर मागवण्यात आले. अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या याठिकाणी कुलिंगचे काम सुरू असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.