ठाणे - भिवंडी शहर व ग्रामीण भागात आगीचे सत्र (Bhiwandi Fire News) सुरु असून, आज दुपारच्या सुमारास पुन्हा एका ऑईलच्या गोदामाला भीषण आग (Oil Depo Fire at Bhiwandi) लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील ओशिया माता कंपाऊंडमधील केमिकल गोदामात घडली आहे.
भिवंडीत अग्नितांडवच्या घटना घडत असून, ग्रामीण भागातील गोदाम पट्टा असलेल्या काल्हेर गावातील एका गोदामात ऑईल व केमिकल साठवून ठेवलेल्या गोदामाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही आग एवढी भीषण होती की आगीच्या धुराचे लोट ४० ते ५० फूट उंच परिसरात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले. ७ ते ८ पाण्याच्या टँकरने आगीवर २ तासात नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
गोदामलगतची काही वाहनेही जळून खाक झाली. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु असून, या आगीत लाखो रुपयांचा ऑईल व केमिकलचा साठा जळून खाक झाला. या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. तर आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.