ठाणे - कामानिमित्त बाहेर जाताना महिला गॅस बंद करायला विसरल्याने घराला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरातील मातोश्री सदन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घडली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्वच संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मातोश्री सदन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर प्रतिभा पांचाळ आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवारी घरातील गॅस शेगडी सुरू ठेवून त्या काही कामानिमित्त कडी लावून बाहेर गेल्या. या दरम्यान घराला अचानक आग लागली. काही वेळातच आग सर्व घरात पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी सुरेश शिंदे, सुरेश गावित, बबलू व्यापारी यांच्यासह 20 - 22 जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा - रेल्वेतून वन्य पशुपक्षांची तस्करी; टोळीच्या म्होरक्यासह तिघे वनविभागाच्या जाळ्यात
त्यांनी तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या अतिरिक्त बंबांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, ठाकुर्लीतील वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दल घटनास्थळी लवकर पोहचू शकत नव्हते. 4 बंबांसह सर्वात अगोदर आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.
इमारतीतील रहिवाश्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत घरातील जवळपास सर्वच साहित्य जळून खाक झाले. स्वयंपाकासाठी असलेली शेगडी चालू राहिल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तासाभरात आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
रस्ता अरूंद असल्यामुळे घटनास्थळी जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. आग लागलेल्या घरात बेडरूममध्ये कपडे आणि कागदपत्रे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले. या आगीत 10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज, अग्निशमन दलाचे अधिकारी सुरेश शिंदे यांनी व्यक्त केला.