ठाणे - कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली असली तरी सर्वांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत कारवाई केली जाते आहे. त्यातच भाजपाने ठाणे जिल्ह्यात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा काढून नागरिकांची गर्दी जमविल्याने कोरोना नियम पायदळी तुडवले आहे. त्यामुळे १६ ते २० ऑगस्टपर्यत ठाणे जिल्हाभरातील वेगवेगळ्या 12 पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल -
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असतानाच ठाणे जिल्ह्यात भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा ठिकठिकाणी काढण्यात येत आहे. यात्रा २० ऑगष्टपर्यंत सुरु राहणार असून या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने भादंविच्या कलम १८८, २६९, २७० सह साथीचा रोग कायदा १८९७ च्या कलम २, ३ ,४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) महाराष्ट्र पोलील अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) १३५ प्रमाणे आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात्रेच्या पहिल्याच दिवशी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात भाजपाच्या आयोजक नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
'या' १२ पोलीस ठाण्यात झाले गुन्हे दाखल -
ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात तर त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीमधील खडकपाडा, महात्मा फुले, मानपाडा, कोळसेवाडी, कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हे दाखल झाले होते. तर कालच उल्हासनगर पोलीस ठाण्यात, तर भिवंडीतील कोनगाव, शांतीनगर, भिवंडी शहर, निजामपुरा आणि नारपोली पोलीस ठाण्यात यात्रेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक ते अर्धातास वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहापूर, मुरबाड हद्दीत भरपावसात यात्रा -
मुरबाड, शहापूर या दोन ग्रामीण तालुक्यात १९ ऑगस्ट रोजी जन आशीर्वाद यात्रा भरपावसात पार पडली. यामुळे ग्रामीण भागात पावसामुळे यात्रेत गर्दी कमी असल्याने शहापूर, मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
हेही वाचा - राज्यातील कुचकामी सरकार कसे लवकर जाईल यासाठी कामाला लागा; नारायण राणेंचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन