मीरा भाईंदर (ठाणे) - भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर जमिनीवर बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाईंदर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -
भाईंदर पश्चिम तोदी वाडी येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांच्या मालकीच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन आले. त्यांनी त्या जमीन परिसरात लावलेले पोस्टर फाडले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या जागेच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकाला शिविगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांनी जमीन खाली करा, असे आदेश दिले, असे अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, जमीन मालक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती प्रशांत केळुसकर आणि मेहतांचे यांचे निकटवर्तीय संजय थरथरे यांच्यासह इतर 35-40 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भाईंदर पोलीस करत आहेत.
हेही वाचा - महाविकास आघाडीत बिघाडी; 'सरकार तिघांचं, मग नाव का दोघांचं? काँग्रेसची पोस्टरबाजी
हेही वाचा - नवतारुण्य मुलीच्या कौमार्याचा दीड लाखात सौदा.. पोलिसांच्या शिताफीने आरोपी आई गजाआड