ठाणे- ठाण्यातील एक कोरोनायोद्धा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. किरण नाकती असे या कोरोनायोध्याचे नाव असून 'वुई आर फॉर यू' या संघटनेच्या माध्यमातून किरण नाकती यांनी एक-दोन दिवस नव्हे, तर तब्बल २४० दिवस घराबाहेर राहून ज्येष्ठ नागरिक, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिवसरात्र सेवा दिली. या दरम्यान किरण हे एकदाही घरी गेले नसून २४० दिवसांनी त्यांनी घरवापसी केली आहे.
२४० दिवस होते घरापासून दूर-
'वुई आर फॉर यू' या संघटनेच्या माध्यमातून किरण नाकती यांनी सुरुवातीला मोफत मास्कवाटप केले. तसेच घरपोच किराणा देणे, आपत्कालीन परिस्थितीत मोफत रिक्षा उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत जेवणाचे डबे पोहोचविणे, एखाद्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास तो परिसर मोफत निर्जंतुकीकरण करणे, घरपोच औषध पोहोचविणे, अशा प्रकारच्या सेवा देत त्यांनी कोरोनाबाधीत रुग्णांची मदत केली. एवढेच नव्हे, तर कोरोनाग्रस्त रुग्णांचे आणि त्यांच्या परिवाराचे समुपदेशन सारखे महत्वाचे कामही किरण करत होते. या सर्व सेवा देत असताना किरण हे घरापासून २४० दिवस दूर होते. दिवाळीच्या मुहूर्तावर नाकती यांनी घरवापसी केली. त्यामुळे नाकती परिवाराने एकत्र दिवाळी साजरी केली. आता संपुर्ण कुटुंबासहीत ही सेवा निरंतर अशीच सुरु ठेवणार, असेही किरण यांनी सांगितले.
कोण आहेत किरण नाकती-
किरण नाकती हे ठाण्यातील रंगमंच कलाकार असून ते मागील अनेक वर्षांपासून अभिनय कट्टा चालवतात. याठिकाणी लहान मोठ्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांना अभिनयामध्ये पारंगत केले जाते. याच अभिनय कट्टा परिसरात मोठी जागा आणि कार्यालय असल्याचा फायदा किरण नाकती यांना कोरोना काळात झाला आणि या ठिकाणाहूनच त्यांनी आपले सामाजिक काम सुरू ठेवले.