ठाणे - उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका कापड दुकानात घुसून काही टवाळखोर तरुणांनी दुकानदाराच्या मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तरुणांनी दुकानातील काचाही फोडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र, मध्यवर्ती पोलिसांनी या घटनेची नोंद अदखलपात्र गुन्ह्यात केली आहे. त्यामुळे, या टवाळखोर तरुणांपासून पुन्हा जिवाला धोका निर्माण होण्याच्या भीतीने दुकानदाराने पुन्हा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्यामुळे, पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
व्यावसायिक हितेश ब्रिजवानी यांचे उल्हासनगर स्टेशन रोड परिसरात धीरज मेन्स वेअर नावाचे कापड विक्रीचे दुकान आहे. काल रात्री पावणे नऊच्या सुमारास भूषण आणि साहिल हे साथीदारांसह ब्रिजवानी यांच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. त्यावेळी या तरुणांनी अचानक कुठल्या तरी कारणावरून ब्रिजवानी यांच्या मुलांना मरहाण केली.
भयग्रस्त कुटुंबाला हल्लेखोरांकडून मारहाणीची भीती
दुकानात घुसून मुलांना मारहाण करून दुकानाचे नुकसान झाले म्हणून हितेश ब्रिजवानी यांनी त्या टवाळखोर तरुणांविरोधात मध्यवर्ती पोलिकांकडे तक्रार केली. मात्र, मध्यवर्ती पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे, पुन्हा हे हल्लेखोर मुलांवर हल्ला करतील या भीतीने ब्रिजवानी कुटुंब भयग्रस्त झाले आहे. कुटुंबाकडून हल्लेखोरांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी आज पुन्हा तक्रार अर्ज देण्यात आला आहे. आता पोलीस त्या हल्लेखोर तरुणांवर काय कारवाई करतात हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा- २५ हजार कोरोना रुग्णांना बरे करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा धनत्रयोदशीच्या दिवशी सन्मान