ठाणे - कारमध्ये मित्रांना लिप्ट देणे एका चालकाला भलतेच महागात पडले. निर्जनस्थळ पाहून कारमधील बसलेल्या मित्रांनीच चालकाला चॉपरचा धाक दाखवून लूटमार केली. त्यानंतर विवस्त्र करून चित्रीकरण करत व्हिडिओ बनवून जर पोलिसात तक्रार दिली तर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लूटमार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्रथमेश वांगुर्ले व त्याचे दोन अनोखळी साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
असा घडला लुटमारीचा प्रकार : कल्याण पश्चिमेतील चिकनघर येथील रिजन्सी टॉवरमध्ये रहाणारे जगदीश भास्कर पवार ( ४५ ) हे पेशाने शिक्षक असून ते मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या मारूती इंडीका कारने कल्याण पूर्वेतील श्रीमलंग रोडवरील नांदीवली येथील बस स्टॉप जवळ आले. त्यांच्या ओळखीचे मित्र आरोपी प्रथमेश वांगुर्ले व त्याचे दोन साथीदारानी कार थांबवून त्यांना लिप्ट मागितली. त्यानंतर आरोपी कारमध्ये बसले असताना श्रीमलंग रोडवरील ढोके गावाकडे कार निर्जनस्थळी असल्याचे पाहून कारमध्ये अचानक जगदीश पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका आरोपीने त्यांना चॉपरचा धाक दाखवून त्यांचा मोबाइल काढून घेतला. त्यानंतर जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांच्या मोबाइलमधून गुगल पे व फोन पे अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात असलेली रक्कम आरोपीचा मित्र विश्वकर्मा याचे खात्यात ट्रान्सफर करून घेतली. तसेच त्यांच्या पाकीटात असलेली रोख रक्कम असे एकूण ६३ हजार ७०० रुपये आणि ४० हजार किंमतीची गळ्यातील सोन्याची चैन, असा एकूण १ लाख ३ हजार ७०० रुपयांचा रोख रकमेसह मुद्देमाल आरोपींनी जबरी काढून घेतला.
विवस्त्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी : आरोपी लूटमारी करून इतक्यावरच थांबले नाहीत तर, आरोपींनी पवार यांना विवस्त्र करून त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर याबाबत कोणाला सांगितले किंवा पोलिसात तक्रार केली तर हा विवस्त्र व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी जगदीश पवार यांनी बुधवारी २० एप्रिल रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.