ठाणे - 'बाप नंबरी, बेटा दस नंबरी' या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी घटना डोंबिवलीत घडली आहे. शहरात बाप-लेकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे बंधू आहेत, अशी थाप मारली. तसेच आमची आयकर विभागातही ओळख आहे. तुम्हाला आयकर विभागातून पकडलेले सोने कमी किंमतीत मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका सोनाराला ५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. आता या बाप-लेकावर विष्णूनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन गडकरी आणि आनंद गडकरी असे गुन्हा दाखल झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे.
सोनार 'गडकरी' नावाला भुलला अन् 5 लाखाला डुबला
डोंबिवली पश्चिमेला राहणारे अमोल पळसमकर यांचे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सोन्याचे दुकान आहे. काही महिन्यापूर्वी आरोपी बाप-लेकाने माझे भाऊ नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आहेत. तुम्हाला आयकर विभागातून पकडलेले सोने कमी किंमतीत मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यांनतर अमोल यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना ५ लाख रुपये दिले. मात्र, बराच कालावधी उलटून गेला. तरीही आरोपीने सोने दिले नाही.
सोनारासह इतरही ७ ते ८ तरुण-तरुणींनाही गंडवले
अखेर सोनाराने आरोपींच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, आरोपी राजन आणि आनंद हे घर सोडून गेल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच ओमकार पवार आणि इतर ७ ते ८ तरुण-तरुणींनाही गडकरी बाप-लेकाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. शिवाय त्यांच्याकडनही पैसे घेऊन पळून गेले असल्याचे तक्रारीत नमूद केले.
आरोपीच्या पत्नीची अजब तक्रार
आरोपी आनंद याची पत्नी गीतांजली आनंद गडकरी (30) या महिलेने तिचा पती, सासरा आणि सासुच्या विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 'माझ्या दोन वर्षांच्या ऋग्वेद या मुलाला पती आनंद (आरोपी), सासरा राजन (आरोपी) आणि सासू अलका यांनी घरातून दवाखान्यात डोस पाजण्याच्या बहाण्याने पळवून नेले आहे', असे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे आता पोलीसही या तक्रारीवरून चक्रावले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - बहुचर्चित रेखा जरे खून प्रेमसंबधांतून, बाळ बोठेसह ६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल, १२ लाखांत दिली होती सुपारी