ठाणे : अभिनेत्री तुनिशा शर्मा सुसाईड प्रकरणात संशयाच्या घेऱ्यात आलेल्या आणि अटक केलेल्या अभिनेता शिझान खान याची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून रविवारी सुटका झाली. तब्बल ७० दिवस कारागृहात राहिल्यानंतर खानला वसई न्यायालयाने १ लाखाच्या जातमुचकल्याचा जामीन शनिवारी मंजूर केला. रविवारी त्याची सुटका करण्यात आली. त्याला घेण्यासाठी कारागृहाच्या बाहेर त्याची बहीण आणि आई उपस्थित होती.
कुटुंबातील सदस्यांची भावनिक भेट : शनिवारी ६९ व्या दिवशी वसई कोर्टाने त्याला जमीन मंजूर केला. शनिवारी शिझानचा न्यायालयीन प्रक्रियेतील मेमो ठाणे मध्यवर्ती कारागृहाला प्राप्त झाला. त्यामुळे रविवारी सकाळीच ११-३० वाजता शिझानची सुटका करण्यात आली. डिसेंबर, २०२२ पासून शीझान बंदिवान होता. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहाबाहेर शिझानच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन कारागृहातून बाहेर आल्यानंतर शिझानचे स्वागत केले, या दरम्यान कुटुंबातील सदस्यांची भावनिक भेट पाहायला मिळाली. तसेच शिझान यांची बाजू लवकरच मांडू, असे त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी सांगितले.
आई आणि बहिणीच्या भावना अनावर झाल्या : टीव्ही मालिकामधून काम करणारा कलाकार शिझान खान याला मालिकांमधून काम करणाऱ्या तुनिशा शर्मा आत्महत्याबाबत संशयावरून अटक करण्यात आलेली होती. तब्बल ७० दिवस न्यायालयाने शिझान याला जमीन दिला नाही. तो कारागृहात बंदिस्त होता. रविवारी सकाळी ११-३० वाजण्याच्या सुमारास शीझान कारागृहाच्या बाहेर येताच बहीण आणि आईच्या भावनांचा बांध फुटला. त्यांनी त्याला मिठी मारून शीझानचे स्वागत केले. दोघींचे डोळे डबडबलेले होते.
शीझानची बाजू मांडण्यात येईल : लवकरच न्यायालयात शिझानची बाजू मांडण्यात येईल, अशी माहिती शिझानच्या बहिणीने दिली. तर शिझानने मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तो घराकडे रवाना झाला. पालघरमधील वालीवजवळ एका टीव्ही मालिकेच्या सेटवर 24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषा शर्माने आत्महत्या केली होती. यानंतर तुनिषा शर्माच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शीझान खानला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. यावेळी वसई न्यायालयाने शीझानला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.