ठाणे: महाराष्ट्रातील ठाण्यातील योग शिबिरात बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी अशोभनीय टिप्पणी केली आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत आयोगाच्या कार्यालयात तक्रार आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत याला तीव्र विरोध केला आहे. राज्य आयोगाच्या तक्रारीनंतर दिल्ली महिला आयोगही अॅक्शन मोडमध्ये आला आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत म्हटले, की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर स्वामी रामदेव यांनी महिलांबाबत केलेली टिप्पणी अशोभनीय आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यामुळे सर्व महिला दुखावल्या आहेत, बाबा रामदेवजींनी या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागावी!
आंदाेलनाचा इशारा: महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणाची माहिती घेतली. आम्ही याचा तीव्र शब्दात विरोध करतो. बाबा रामदेव यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा दोन दिवसात आयोगाच्या कार्यालयात करावा,' असे ट्वीट महिला आयोगाने केले आहे. 'साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिले, तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात', असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. आपल्या वक्तव्याने सोशल मीडियात विविध स्तरांतील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे तक्रारदारांनी म्हटल्याचे निवेदन महिला आयाेगाने जारी केले आहे. रामदेवबाबा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दाेन दिवसांच्या आत खुलासा पाठविण्याची नाेटीस दिली आहे. राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसने वक्तव्याचा निषेध करत आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
वक्तव्याबाबत खुलासा करण्यासाठी 3 दिवसांचा अवधी: या तक्रारीला अनुसरून राज्य महिला आयोगाचे (State Commissions for Women) कलम 12 (2) आणि 12 (3) 1993 अन्वये तुम्हाला या वक्तव्याबाबत खुलासा करण्यासाठी 3 दिवसांचा अवधी देण्यात येत आहे, अशी नोटीस महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी बाबा रामदेव यांना पाठवली आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपस्थित होते.