नवी मुंबई - ऐरोलीमध्ये प्रथमच महिला बचत गटांच्या माध्यमातून ढोल ताशा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या ढोल ताशा पथकाचे उद्घाटन समाजसेविका वैशाली पाटील यांच्या शुभहस्ते ऐरोली येथील शिव कॉलनी येथील मैदानात करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच ढोल ताशांचे पूजन करण्यात आले.
ऐरोली येथील बचत गटाच्या महिला अध्यक्षा करिश्मा चव्हाण यांनी महिला वर्गाला एकत्र करत समाजसेवक रेवेंद्र पाटील व वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमल्हार या ढोल ताशा पथकाची निर्मिती केली केली. यामध्ये ढोल ताशा वाजविण्यासाठी फक्त महिला असतील. तसेच शिवमल्हारचा आवाज हा संपूर्ण महाराष्ट्रात गाजवतील, असा आत्मविश्वास महिलांनी या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केला.
नवी मुंबईतील शिवमल्हार हे पहिलेच ढोल ताशा पथक महिलांचे असून अशा पथकांमध्ये महिलांनी पुढे येऊन सहभाग घेऊन स्वतःला सक्षम बनविले पाहिजे, असे आवाहन समाजसेविका वैशाली पाटील यांनी केले आहे. या ढोल ताशा पथकात प्रियांका नारळकर, सोनू बोऱ्हा, सुचिता धुट्टे, रोहिणी भोसले, शुभांगी गजरे, वंदना जाधव, उषा ओढे, सुनीता कांबळे, कोमल कालमंद्रगी, रेश्मा कांबळे आदी महिलांचे सहकार्य लाभले.