ठाणे - देशभरात हाय अलर्ट घोषित केल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तब्बल ९५८ वर्ष जुन्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरातील गाभाऱ्यात भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे येत्या सोमवारी महाशिवरात्रीला भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. महाशिवरात्रीला येथे लाखोंच्या संख्येने भाविकांची मोठी गर्दी उसळते. मात्र यंदा या भाविकांना गाभाऱ्यात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेता येणार नाही.
भारताच्या हवाई दलाने पाकव्याप्त बालाकोटयेथे जैश-ए-मोहम्मदच्या शेकडो दहशतवाद्यांना ठार मारल्याच्यापार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामध्ये अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिर परिसरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जातआहे. स्थानिक पोलिसांचा मंदीर व भोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्हीचे जाळेही पसरवण्यात आले आहे.
तब्बल ९५८ वर्ष जुन्या असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीला ४ लाखांपेक्षा जास्त भाविक भेट देतात. शिवाय ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्राही शिवमंदिर परिसरात भरते. शिवमंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याने या गर्दीत घातपात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळेच यंदाच्या वर्षी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच मंदिर आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांचा हिरमोड होणार असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी केले आहे. हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.