ठाणे - निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपण्यात येत असते. मात्र, त्यांना देण्यात येणार्या नियुक्त्या या त्यांच्या घरापासून लांब देण्यात येतात. त्यामुळे त्यांना मतदानाच्या दिवशी सर्व प्रक्रिया पुर्ण करून घरी जाण्यासाठी रात्री उशीर होत असतो. त्यामुळे मतदानाच्या नियुक्त्या देताना शिक्षक कर्मचार्यांना त्यांच्या घरापासून जवळच्या अंतरावर नियुक्त्या देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्यावेळी शिक्षक कर्मचार्यांना निवडणूक विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी दिली. त्यात अनेक केंद्रावर महिला कर्मचार्यांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षक कर्मचार्यांना मतदानाच्या दिवशी देण्यात येणार्या नियुक्त्या या त्यांच्या घरापासून लांब लांब देण्यात येत असतात. त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरची इतर कामे पुर्ण करावी लागत असतात. त्यामुळे जास्ती वेळ खर्ची पडत असतो. परिणामी त्या कर्मचार्यांना घरी जाण्यासाठी उशीर होतो.
तसेच आजचे युग हे डिजिटल युग आहे, असे असताना देखील निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात कागदांचा वापर होत असतो. हा कागदांवर होणारा खर्च टाळावा अशी मागणी देखील पाटील यांनी केली. मतदान केंद्राच्या दिवशी काम करणार्या कर्मचार्यांच्या मानधन हे कमी आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करावी असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारी कामात हलगर्जीपणा झाल्यास त्या संबंधीत अधिकारी व कर्मचार्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येत असते. मात्र, निवडणूक निर्वाचन आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात कोणी लक्ष देत नाही. त्यात या कामाचा वाढत्या ताणामुळे अनेक कर्मचार्यांचे जीव जात असतात. याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे देखील पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणूकीचे कामे करण्यासाठी आम्ही शिक्षक सदैव तयार आहोत. पण केंद्रावर होणार्या गैरसोयींबाबत निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घेत, तेथे सोयी सुविधा पुरवाव्यात अन्यथा सर्व संघटना एकत्र येवून निवडणूकीचे काम न करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकूळ पाटील यांनी दिला आहे.