ठाणे - जिल्ह्यात सर्वाधिक मुस्लिम वस्त्या असलेल्या भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद-ए-मिलाद-उन-नबी म्हणून मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येते. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही भिवंडी शहरात सार्वजनिक मिरवणुकीस परवानगी न मिळाल्याने मुस्लिम धर्मीयांचा हिरमोड झाला.
मिरवणुकीला 37 वर्षे होती बंदी
भिवंडीत ईद-ए-मिलाद-उन-नबी मिरवणुकीस 37 वर्षे बंदी असताना तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी 2005 मध्ये या मिरवणुकीस परवानगी दिली. तेव्हापासून कोटरगेट जामा मस्जिद ते मामाभांजा दर्गा, चाविंद्रापर्यंत मिरवणूक काढण्यात येते. ज्यामध्ये लाखो नागरीक सहभागी होतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीस बंदी असून यंदा कोरोना संक्रमण कमी झाल्याने मिरवणुकीस परवानगी द्यावी, अशी मागणी रजा अकादमीचे शहराध्यक्ष मोहम्मद शकील राजा यांच्या नेतृत्वाखाली केली होती.
दहा जणांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक मिरवणूक
पोलीस प्रशासनाकडून ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्सव समितीस केवळ दहा जणांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 19) सायंकाळी चार वाजता प्रमुख अतिथी मौलाना अब्बास रजवी यांच्याकडून प्रार्थना करून ईद-ए-मिलाद-उन-नबी मिरवणूक ट्रस्ट च्या नेतृत्वाखाली मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले.
भिवंडीत मोठा पोलीस फौजफाटा तैनात
मिरवणूक असल्याने अनेकांनी कोटरगेट परिसरात गर्दी केली होती. त्या सर्वांना पोलिसांनी पांगवत या परिसरातील सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करत मिरवणुकीत नागरीकांना सामील होण्यापासून परावृत्त केले. त्यासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा - कल्याणच्या कारागृहात कैद्यांना कोरोनाची लागण; बंदी, जेल प्रशासन अलर्ट