ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सखल भागातील बहुतांश शाळांची पुराच्या पाण्यात बुडून दुरवस्था झाली आहे. मात्र, या शाळांकडे शिक्षण मंत्री फिरकलेच नाही. कल्याणमधील खाडीलगत असलेल्या गोविंदवाडी परिसरात रविवारी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.
4 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली परिसरातील खाडी लगत असलेल्या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. शेकडो नागरिकांच्या संसारपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच परिसरातील खाडीलगत असलेल्या गोविंदवाडी परिसरातही दोन दिवस पुराचे पाणी होते. त्यामध्ये शेकडो नागरिक अडकून पडले होते. अग्निशामक व महापालिका प्रशासनाने बाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. याच परिसरात रविवारी स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांच्यासह शिक्षण मंत्री आशिष शेलार, खासदार कपिल पाटील यांनी पाहणी दौरा केला.
परिसरातील नागरिकांसाठी आमदार पवारांनी चादरी, ब्लँकेट व अन्न धन्य वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी शिक्षण मंत्री आशिष शेलार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पूरग्रस्त नागरिकांना मदत करताना अधिकृत व अनधिकृत किंवा कोणत्याही शासकीय नियमात व लालफितीत अडकून न पडता ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना मदत करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, प्रशासनाने अधिकृत घोषणा करूनही कल्याण मधील पूरग्रस्त भागातील पंचनामे केले नाही. या परिसरात दहा फूटा पर्यंत पाणी होते. असंख्य लोकांचा संसार यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्यांना न्याय दिला जाईल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. तसेच आपल्या सर्वांच्या अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पोहोचवून शासनाची जास्तीत जास्त मदत मिळवून देवू असे सांगितले. मात्र, या परिसरात अनेक शाळा आहेत. त्या शाळांमध्ये पुराचे पाणी शिरून शाळांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे, मात्र त्याकडे शिक्षण मंत्री फिरकले नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे कल्याण पश्चिम परिसरातील बारवे गावात साईलीला उद्यानाचा लोकार्पण सोहळा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा संघर्ष समितीची बैठक स्प्रिंग टाइम क्लब येथे आयोजित केली होती. भाजपा सदस्यता अभियान व मतदान नोंदणी कार्यक्रमालाही शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली. त्यानंतर आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यालयासमोर प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले होते.