ठाणे : नितीन प्रजापती असे मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. प्रथमेश पाटील आणि नंदकुमार पाटील अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करा, अन्यथा आंबिवली परिसरातील क्लिनिक बंद ठेवण्याचा डॉक्टर संघटनेने इशारा दिला आहे. मंगळवारी अटाळी गावात रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाच्या पायाला काच लागली होती. त्यामुळे हा तरुण पायाला मलमपट्टी करण्यासाठी डॉ. नितीन प्रजापती यांच्या गुरुकृपा क्लिनिकमध्ये गेला. यावेळी तो तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची अवस्था पाहून डॉक्टर प्रजापती यांनी त्याला दारू प्यायला आहेस का ? असे विचारले. दारू प्यायल्याचे विचारल्याने हा तरुण संतापला. त्याच्यासह मित्राने डॉक्टरांशी हुज्जत घालत मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी आरोपी तरुणांविरोधात खडकपाडा पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
तरुणांवर जीवघेणा हल्ला: दरम्यान डोंबिवली पश्चिम भागातील देवीचापाडा नजीक असलेल्या सातपुलावर १० ते १५ जणांच्या टवाळखोर टोळक्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या टोळक्याने तरुणाला लाथाबुक्की, बेदम मारहाण करत दारुच्या बाटल्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवीगाळ बेदम मारहाण: ओमकार माळी आणि त्याचा मित्र मंगळवारी दुपारी कामानिमित्त सातपूल रेल्वे पुलावरुन पायी पिंपळास भागात गेले होते. सायंकाळच्या सुमारास दोघे घरी परत येत असताना सातपूल रेल्वे पुलावर बाल्कनीत आरोपी टोळके उभे होते. त्यांनी अभिषेक यांच्या मित्रांजवळ येऊन आम्ही या भागाचे भाई आहोत. तडीपारी भोगून आलो आहोत. आम्हाला ओळखले नाही का, असे बोलून पुलावरच अचानक अभिषेकसह त्याच्या मित्र ओमकारला शिवीगाळ बेदम मारहाण सुरू केली. मारहाणी नंतर सर्वच आरोपी पळून गेले. अभिषेकच्या मित्रांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत विष्णुनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीसांच्या सूचनेवरुन त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.