ठाणे - महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील तृतीयपंथीय यांचे हक्क संरक्षण व कल्याण करण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला. त्यानुसार ठाणे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये उल्हासनगर मधील तृतीयपंथीय डॉ. योगा श्रीलेश श्रीनिवासन नांबियार यांच्यासह तृतीयपंथीसाठी काम करणाऱ्या साध्य पवार या दोघांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून १ जून २०२१ रोजी काढण्यात आले. डॉ. योगा श्रीलेश हे ग्लोबल राईट्स फाउंडेशनचे डायरेक्टर असून गेली अनेक वर्ष तृतीयपंथीयांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत.
तृतीयपंथीय हक्क संरक्षण समितीला मंजुरी -
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १३ डिसेंबर २०१८ रोजी तृतीयपंथी व्यक्तीला अधिकार संरक्षण समितीचे नियम लागू केले. या नियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी ७ ऑक्टोबर २०२० रोजी करून सामाजिक न्याय विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तृतीयपंथीय हक्क संरक्षण समिती गठीत करण्याचे अधिकार दिले. शिवाय तृतीयपंथीयांना आधारकार्ड, रेशन कार्ड, तसेच उत्पन्न स्त्रोत उपलब्ध व्हावा यासाठी व्यवसाय, बँकांकडून कर्ज पुरवठा करणे, तृतीयपंथीयांची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधणे, जिल्हा निवडणूक शाखेकडे उपलब्ध असलेली तृतीयपंथीय मतदारांची यादी प्राप्त करून घेणे, इत्यादी कामे या समितीमार्फत होणार असल्याचे सांगण्यात आले.
तृतीययपंथीय यांचे हक्क संरक्षण व कल्याण करण्याच्या उद्देशाने तक्रार निवारण करणेकामी जे काही होऊ शकेल ते कार्य मी करण्याचा प्रयत्न करणार असून यापुढेही अधिक जोमाने हक्काच्या लढ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उल्हासनगरचे डॉ. योगा श्रीलेश श्रीनिवासन नांबियार यांनी ‘ई टीव्ही भारत’शी बोलताना सांगितले.