ठाणे - उल्हासनगरच्या सर्वानंद रुग्णालयातील 180 पेक्षा अधिक कमर्चारी गेली 20 वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करत होते. कायद्यानुसार वेतन दिले जात नसल्याने या कामगारांनी मनसे कामगार संघटनेकडे धाव घेतली होती. त्यावर मनसे नेत्यांनी सर्वानंद रुग्णालयात जाऊन प्रशासनाला मनसे स्टाईलने जाब विचारताच प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 5 या भागात स्वामी सर्वानंद ट्रस्टतर्फे सर्वानंद रुग्णालय चालवले जाते. या रुग्णालयात सध्या 180 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. त्यातील बहुतांशी कर्मचारी हे 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहेत. त्यांना अवघ्या 3 हजार ते 5 हजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागत होते. तर मेडिक्लेम व इतर सुविधाही दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे या प्रकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी मनसे कामगार संघटनेकडे धाव घेत तक्रार केली.
त्यानुसार मनसे कामगार संघटनेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह अन्य नेत्यांनी सर्वानंद रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी 20 पेक्षा जास्त मागण्यांवर रुग्णालय प्रशासनाबरोबर चर्चा केली. अखेर जून महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
त्यामुळे मनसेच्या प्रयत्नामुळे 20 वर्षानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया येथील कामगारांनी व्यक्त केली. यावेळी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच रुग्णालय आवारात मनसे कामगार संघटनेच्या फलकाचेही अनावरणही करण्यात आले.