ठाणे - ११ एप्रिलला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली असून त्याबाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत. सध्या राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यात ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा करण्यात येत होती. याची कोणतीही अधिकृत घोषण केली नसली तरीही लवकरच नवीन तारखा घोषित करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
सर्व परीक्षा पुढे ढकला...
दुसरीकडे एमपीएससी परीक्षेबाबत मागच्यावेळी राजकारण केले गेले. ते राजकारण केले नसते तर ही वेळ आली नसती. आता लॉकडाऊन आहे त्यात काही विद्यार्थी पॉझिटीव्ह आले आहे. घरी जाण्यासाठी पैसे नाही, अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांसमोर आहे. जेव्हा परीक्षा घ्या तेव्हा राजकारण केले गेले आणि आता खरोखरच परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री यांना मागणी करतो की, कोणतीच परीक्षा घेऊ नका. सर्व परीक्षा पुढे ढकला. पुढील महिना दोन महिने परीक्षाच घेऊ नका अशी माझी मागणी आहे. एमबीबीएसच्या परीक्षा आहेत. तसेच दुसरीकडे लसीचे आणि इंजेक्शनचे राजकारण सुरू आहे. आजच्या बैठकीबाबत मला माहिती नाही. युद्धात आणि अशा परिस्थितीत राजकारणाला जास्त महत्व देऊ नये. राजकारण करू नये केंद्राच्या पाया पडायला लागले तरी ठीक आहे परंतु लोकांचा जीव वाचवणे महत्वाचे आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.