ठाणे - मुलं होत नसल्याच्या कारणावरून एका विवाहितेला जबर मारहाण करून खोलीत डांबल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तालुका अंबरनाथ काकडवाल गावात घडला असून पीडित विवाहितेवर डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राजक्ता भाने असे पीडित विवाहितेचे नाव आहे.
कल्याण तालुक्यातील काटाई गावात राहणाऱ्या प्राजक्ताचा अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावातील नवनाथ लहू भाने याच्याशी २३ फेब्रुवारी २०१५ ला विवाह झाला होता. पीडित प्राजक्ताच्या म्हणण्यानुसार लग्नाचा दीड महिन्यानंतर तिला दिवस गेले. परंतु, काहीतरी कारण सांगून पती नवनाथ व सासरच्या लोकांनी प्राजक्ताचा गर्भपात केला. ६ महिन्यानंतर सासू अनुबाई आणि प्राजक्ताचे दीर निवृत्ती, अश्विन आणि त्यांच्या दोन्ही पत्नी प्राजक्ताला दिवस का जात नाहीत, म्हणून टोमणे मारू लागल्या. दरम्यान, प्राजक्ताचा सासरच्या लोकांकडून छळ करता-करता ४ वर्षे निघून गेली. मात्र, प्राजक्ता पुन्हा गर्भवती न राहिल्याने तिला 'वांझोटी' असे संबोधून नवरा, सासू-सासरे प्राजक्ताचा तिरस्कार करून मारहाण करू लागले. नवनाथचे दुसरे लग्न करायचे आहे, असे सांगून घटस्फोट देण्याचीही धमकी देऊ लागले.
हेही वाचा - राजकीय पक्षांनी निवडणुकीआधी दिलेले आश्वासन 'फेल'; दिव्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध
दरम्यान, २ डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास प्राजक्ताला बेडरूममध्ये बोलावून नवऱ्यासह सासरच्या लोकांनी खोली बंद करून तिला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये प्राजक्ता गंभीर जखमी झाली आणि तिला २ दिवस उपाशी पोटी खोलीत कुणालाही न कळविता डांबून ठेवण्यात आले. त्यांनतर ४ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता प्राजक्ताने सासरच्या तावडीतून सुटून जखमी अवस्थेत माहेर गाठले. घडलेला प्रसंग आई-वडिलांना सांगून हिल लाईन पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या जखमी प्राजक्ताला डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - ठाण्यात चैनीसाठी घेतलेल्या वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या