ठाणे- कल्याण - डोंबिवली शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पोलिसांनी वाहन चोरट्यांचा शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांच्या तावडीत रिक्षा चोरी करण्यात पटाईत असलेले सराईत त्रिकुट सापडलं. शंतनु काळे, विशाल इंगोले, किरण भोसले अशी रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांची नावे असून या तिघांवर नवीमुंबई, डायघर, मुंब्रा, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांनी गुन्हा दाखल असलेल्या ठिकाणाहून रिक्षा व दुचाक्या चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून सात रिक्षा व दोन दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चोळे गाव येथील एक रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. याच दरम्यान पोलिसांचे पथक गस्त घालत असताना डोंबिवलीतील सुनील नगर परिसरात एका रिक्षामध्ये दोन इसम हे संशयित रित्या बसल्याचे दिसून आले. गस्ती पथकाला संशय आल्याने त्यांनी या दोघांना हटकले पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांची चौकशी केली असता सदर रिक्षा चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी रिक्षा हस्तगत करत आरोपी शंतनु काळे, विशाल इंगोले या दोघांना अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी साथीदार किरण भोसले सोबत मिळुन डोंबीवली, नवीमुंबई, डायघर, मुंब्रा, मानपाडा या ठिकाणावरून रिक्षा चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी किरण भोसले याचा कसोशीने शोध घेतला. त्याला डोंबीवली पुर्व परिसरातील खंबाळपाडा या भागातून ताब्यात घेवून विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली
सदर गुन्ह्यातील आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लपवून ठेवलेल्या रिक्षा व मोटारसायकलीचा शोध घेवुन 7 रिक्षा व 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.