नाशिक : कांद्यासोबतच लसणाचे भाव देखील आता वाढताना दिसून येत आहेत. त्यात लसणाचा भाव 400 रुपये किलोवर गेल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी लसणाचा वापर काटकसरीनं सुरू केलाय. अशातच चोरट्यांनी आपला मोर्चा लसणाकडं वळवला आहे. नाशिकच्या पंचवटी बाजार समितीतील दुकानातून तब्बल साडेतीन लाखांचा 1100 किलो लसूण लंपास करण्यात आला आहे. याबाबत अज्ञात संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लसणाच्या 22 गोण्यांची चोरी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक घटल्यानं लसूण तब्बल 400 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचलाय. त्यामुळं सर्व सामान्य ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अशात भाववाढ झाल्याचं लक्षात येताच चोरट्यांनी लसणावर डल्ला मारलाय. पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्यादी तुषार कानकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 क्रमांकाचं दुकान आहे. त्यांच्या दुकानातातून 11 नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांनी 1100 किलो वजनाच्या लसणाने भरलेल्या 22 गोण्या चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कानकाटे यांनी पंचवटी पोलिसांकडं 3 लाख 50 रुपयांच्या लसणाची चोरी झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. लसणाची चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर इतर व्यावसायिकांनी माल सुरक्षित ठेवण्यावर भर दिला आहे. तर पोलिसांनीही बाजार समिती परिसरात गस्त वाढवली आहे.
पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू : मागील वर्षी लसूण तब्बल अडीचशे रुपये किलो होता. त्यावेळी शहरातील सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटमधून 30 किलो लसणाची गोणी पळविल्याची घटना घडली होती. यंदा लसूण महागल्यानं आणि पुन्हा मोठी चोरी झाल्यामुळं पोलिसांनी व्यवसायिकांना माल सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हॉटेलमधून लसूण गायब : गेल्या तीन ते चार महिन्यापासून लसणाचे भाव सातत्यानं वाढत आहेत. "आमच्या हॉटेलमध्ये चना गार्लिक या पदार्थाला मागणी अधिक आहे. मात्र लसणाचे भाव सातत्यानं वाढत असल्यानं आम्हाला हा पदार्थ ग्राहकांना देणं कठीण जात आहे. याबाबत ग्राहकांना देखील कल्पना असल्यानं तेही मग दुसऱ्या पदार्थाची मागणी करत असल्याचं", हॉटेल व्यवसायिक संतोष पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा -