ठाणे - गेल्या चार महिन्यात झपाट्याने वाढलेल्या कोरोनाचा प्रसार भिवंडी आणि उल्हासनगर महापालिका हद्दीत आटोक्यात आला आहे. सोमवारी भिवंडीत केवळ ५ कोरोना बाधित रुग्ण तर उल्हासनगर महापालिका हद्दीत ३३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येते. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी २१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकट्या कल्याण-डोंबिवली शहरातील रुग्णांची संख्या ४८ हजार १०७ वर पोहोचली आहे. तर कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे सोमवारी आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ९६३ इतकी झाली आहे.
उद्योग नगरी समजल्या जाणाऱ्या दाटीवाटीच्या उल्हासनगरात सोमवारी ३३ नवे रुग्ण सापडल्यामुळे रुग्णांची संख्या ९ हजार ८९१ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२५ इतकी झाली आहे. तर कामगारचे शहर असलेल्या भिवंडीत केवळ पाच रुग्ण नव्याने आढळले असून एकही मृत्यू आज झाला नाही. त्यामुळे भिवंडी शहरात आतापर्यत बाधीत ६ हजार ६७४ रुग्णांची, तर ३२८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत २५ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत बाधित रुग्णांची संख्या ७ हजार १९ वर गेली आहे. तर २५९ मृत्यू आजपर्यंत झाले आहे. बदलापूर नगरपरिषद हद्दीत ३२ रुग्ण नव्याने सापडले असून बाधीत रुग्ण ६ हजार ९८८ झाले आहेत. मात्र बदलापूर शहरात सोमवारी एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ९३ आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ तालुक्यात ११५ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ तालुक्यात बाधीत रुग्णांची संख्या १६ हजार १४९ झाले आहेत. तर मृत्यूची संख्या ४९० नोंदवण्यात आली आहे.
हेही वाचा - तीन तासांच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे हाल कळतील का? - अनिल बोंडे
हेही वाचा - ठाण्यातील ग्लोबल कोविड रुग्णालयात बोगस डॉक्टर; आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश