ठाणे - भंडारा जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्कीटमुळे विशेष नवजात बालक केअर युनिटमध्ये (एस.एन.सी.यु.) आग लागली. या आगीमुळे झालेली दुर्घटना लक्षात घेता मिरा-भाईंदर शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांचे फायर ऑडीट करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी केली.
हेही वाचा - उल्हासनगरात कामबंद आंदोलनाचा इशारा देताच सातवा वेतन आयोग लागू
भंडाऱ्यातील दुर्घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मिरा-भाईंदर शहरातील सरकारी व खासगी शाळा, महापालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, प्रसुती गृहे, सिनेमा गृहे, मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लॉजिंग बोर्डींग, सर्व सरकारी कार्यालये, फर्निचर विक्रेत्यांचे शोरूम आणि गोडाऊन, गॅस सिलेंडर गोडाऊन, खाद्यतेल विक्रीचे गोडाऊन, दुचाकी व चारचाकी वाहनांचे शोरूम आदी ठिकाणी शॉर्ट सर्कीटमुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लघू उद्योग क्षेत्रात अनेक ठिकाणी परवाने नाही...
भाईंदर पूर्व क्षेत्रात लघू उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर जाळे पसरलेले आहे. अनेकदा या ठिकाणी आग लागण्याच्या दुर्घटना देखील घडल्या आहेत. त्याचप्रमाणे या शहरात आता टोलेजंग टॉवर्सची निर्मितीदेखील होत आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे इंदिरा गांधी आणि पंडित भिमसेन जोशी नावाचे रुग्णालय आहे. तर, अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे अग्निशमन विभागाचा परवानादेखील आढळून येत नाही. या सर्व बाबी भविष्यात मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणाऱ्या ठरणार असून, त्यामुळे नागरिकांच्या जिवीताला धोका संभविण्याची दाट शक्यता आहे.
विशेष तज्ज्ञांची नेमणूक करा...
मिरा-भाईंदर महानगरपालिकेने याकरीता वरील सर्व ठिकाणांचे फायर ऑडीट करणे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे, खबरदारीची उपाययोजना म्हणून या सर्व आस्थापनांचे फायर ऑडीट करण्यासाठी स्वतंत्र पथक अग्निशमन विभागामार्फत तैनात करावे. आपल्याकडे फायर ऑडीट करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक केलेली नसल्यास या शहराची गरज लक्षात घेता खासगी तत्वावर विशेष तज्ज्ञांचे पथक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली.
हेही वाचा - 'उद्धव ठाकरे आपडा' टॅगलाईनवरून मुख्यमंत्री कार्यालयाला मनसे आमदाराचे गुजरातीत ट्विट