ठाणे - रक्षाबंधन हा भावाबहिणीच्या अनोख्या नात्याचा सण असतो. मात्र, ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलींनी या सणाच्या निमित्ताने समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या अग्निशमन दल व टीडीआरएफच्या जवानांना राखी बांधून नातेसंबंध दृढ केले. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या १७ वर्षांपासून काम करणाऱ्या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या या जवानांच्या हातावर बांधल्या.
ठाण्यातील जागृती पालक या विशेष मुलांची संस्था वर्षभरात प्रत्येक सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करते. मागील वर्षी सफाई कर्मचारी आणि त्याआधी वाहतूक पोलिसांना राख्या बांधून या मुलींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला होता. यंदा ठाणे पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तसेच एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे शहरात नेमलेल्या टीडीआरएफच्या जवानांना या विशेष मुलींनी राख्या बांधल्या.
या कार्यक्रमात संस्थेतील ४० विद्यार्थी - विद्यार्थिनी, पालक सहभागी झाले होते. यावेळी ठाणे अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी गिरीश झलके, टीडीआरएफचे डेप्युटी कमांडट अरुण राऊत, जागृती पालक संस्थेचे सचिव रहीम मुलाणी, सल्लागार शामश्री भोसले, सदस्य प्रल्हाद चौधरी, हेमंत भाटे, मनोहर तेजम, संजीवन जाधव आदी उपस्थित होते.