ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात मनसेचे कार्यकर्ते आणि महानगरपालिका सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हे प्रकरण एवढे वाढले की दोघांनीही एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघांनीही मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने २ दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. हिराघाट परिसरात थारासिंग दरबारजवळ अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने २५ ते ३० दुकाने रस्ता रुंदीकरणाच्या कामात निष्कासित केली. यामध्ये आझादनगर, महादेव कंपौंड, कल्याण-मुरबाड रोडलगतच्या १४ अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर मनपाचे सहाय्यक आयुक्त व अनधिकृत बांधकाम विरोधी पथक प्रमुख गणेश शिंपी हे मनपा कर्मचारी शामसिंग, विश्वनाथ राठोड, विलास मुंडेसह आदी दुपारी ३ च्या सुमारास मनपाच्या मुख्यालयात आले होते. त्यावेळी मनसेचे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी गणेश शिंपी यांना या कारवाईचा जाब विचारला. ही कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
शहरात मोठ्या प्रमाणात भूमाफियांची अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. शासकीय भुखंडे हडप करून, बनावट नकाशे सादर करून मोठमोठे अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई न करता गरिबांच्याच कामांवर कारवाई करण्यात येत आहे. मोठ्या बांधकामांवर तुम्ही कारवाई करत नाही. कारण तुम्ही त्यांच्याकडून पैसे खाता, असा आरोप देशमुख यांनी गणेश शिंपी यांच्यावर सर्वांसमोर केला. यानंतर गणेश शिंपी यांनी देखील तुम्हीदेखील वसुली करीत असता, असा आरोप देशमुख व त्यांच्या साथीदारांवर केला. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की दोघांनीही एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी उपआयुक्त युवराज भदाणे आणि सूरक्षा रक्षकांनी मध्यस्थी त्याच्यातील वाद मिटवला.
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात योगीराज देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मनसेचे स्थानिक नेते मेनुद्दीन शेख, बंडू देशमुख, प्रदीप गोडसे यांनी योगीराज देशमुख यांच्यासोबत मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले आणि गणेश शिंपी यांच्याविरुद्ध तक्रार केली असता, अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.