ठाणे : कोणतीही शस्त्रक्रिया म्हटली की, त्याचा खर्च ऐकूनच रुग्णांच्या कुटुंबीयांच्या छातीत धडकी भरते. आधीच शस्त्रक्रियेची भीती आणि त्यात हॉस्पिटलची प्रचंड बिलं बघून भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी येते. त्यात जर मेडिक्लेम नसेल तर मात्र डोक्यावर कर्जाचा डोंगर पक्का; परंतु यातून सर्वांत सुकर मार्ग म्हणजे ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल. सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आणि त्यांच्या समर्पित टीमने "मानवसेवा हीच ईश्वरसेवा" या म्हणीप्रमाणे येथे येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे व्रत घेतले आहे.
पायाची बोटे हलेनाशी झाली अन् : ठाण्यातील फीओना आणि फ्रॅंक पॉवल हे एक मध्यमवर्गीय दांपत्य. फीओना पॉवेल ह्यांना गेल्या दोन अडीच वर्षांपासून मणक्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्या पायाची बोटे हलेनाशी झाल्यावर त्यांनी घाबरून एका खासगी अस्थिव्यंग तज्ज्ञाची भेट घेतली. शस्त्रक्रियेसाठी तब्बल सहा ते सात लाखांचा खर्च ऐकून पॉवल दाम्पत्याला धक्काच बसला. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सिविलचे डॉ. पवार यांचे नाव सुचवले. डॉ. पवार यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. साळवे आणि संपूर्ण टीमच्या सहकार्याने फिओना यांना दाखल करून घेतले. यानंतर ऑन कॉल म्हणजे बाहेरून आलेल्या डॉ. विश्वनाथ कांबळे यांच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडली.
फ्रॅंक पॉवल यांनी जोडले हात : आपल्याला त्रास सुरू झाल्यानंतर आपण खचून गेलो होतो; परंतु सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने आपले मनोधैर्य वाढवून एवढे दिवस आपली सेवासुश्रुषा करून स्वतःच्या पायावर आपल्याला उभे केले. त्यामुळे आपण सर्वांचे ऋणी आहोत, असे भावपूर्ण मनोगत फिओना यांनी व्यक्त केले. आपल्या पत्नीच्या मणक्यातील गादीला सूज आल्याने तिला प्रचंड वेदना होत होत्या. त्यातच पायाची बोटे हलत नाहीत हे पाहून आमच्या पायाखालची वाळूच सरकली होती. अशात डॉ. पवार आणि त्यांचे सहकारी देवदूत बनून मदतीला धावून आले. त्यामुळेच आम्ही या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडू शकलो, असे म्हणत फिओनाचे पती फ्रॅंक पॉवल यांनी अक्षरशः हात जोडले.