मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर-नायगाव खाडीवरील ब्रिटिशांनी बांधलेला रेल्वे पूल तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा पूल १३३ वर्षे जुना असून आता तो इतिहास जमा होणार आहे. पूल तोडण्याचे काम पुढील दोन महिने चालणार आहे.
हेही वाचा - कार्तिकी वारी यंदा नकोच; जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षकांचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव
तत्कालीन ब्रिटिश सरकारने नायगाव-भाईंदर रेल्वे पूल बांधला होता. १२ एप्रिल १८८७ पासून तो वापरात होता. मजबुतीसाठी याची बांधणी त्या काळी अवजड लोखंडी साहित्याने केली होती. मुंबई ते विरार अशी पहिली रेल्वे या पुलावरून धावली होती. परंतु पूल बांधल्यापासून १०० अधिक काळ लोटल्यानंतर १९९० पूल जुना झाल्यामुळे धोकादायक बनला होता. १९९० सालापासून या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली. जुना पूल बंद झाल्यानंतर रेल्वेने भाईंदर-नायगावदरम्यान नवीन पूल बांधला. त्यानंतर रेल्वेची वाहतूक नवीन पुलावरून सुरू करण्यात आली.
जुना रेल्वे पूल जीर्ण झाल्यामुळे तो तोडण्यात येत असून प्रथम टप्प्यात ७५ क्रमांकाचा पूल तोडण्यात येणार आहे. याचे काम दोन महिने चालणार आहे. त्यानंतर ७३ क्रमांकाचा पूल तोडण्याची निविदा काढण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी दिली.
हेही वाचा - नांदेड: दररोज ७ ते ८ हजार भाविक घेत आहेत सचखंड गुरुद्वाराचे दर्शन