ठाणे- डोक्यावर बंदूक ठेवून लोकशाही होत नाही, तर लोकशाहीत चर्चेतून मार्ग काढले जातात. मात्र, हे सरकार आम्हाला बंदुकीचा धाक दाखवून घाबरवण्याचे काम करते आहे, असा टोला लगावत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला पुन्हा डीवचवण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे सविनय कायदे भंग आंदोलन प्रकरणात देशपांडे यांनी कार्यकर्त्यांसह विना तिकीट प्रवास केल्याने त्यांच्यासह चार मनसैनिकांना कर्जत लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. आज दुपारी संदीप देशपांडे, गजानन काळे, संतोष धुरी, अतुल भगत या सर्वांना कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कल्याण लोहमार्ग न्यायालयात हजर केले. लोहमार्ग न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, दुपारनंतर या चारही नेत्यांना १५ हजाराच्या जातमुचलक्यावर कल्याण लोहमार्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, पुन्हा त्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी १०७ ची नोटीस बजावली आहे.
अटकेबाबत बोलताना, १५३ ही कलम रेल्वेच्या टपावर बसून, अथवा रेल्वेत स्टंटबाजी केल्याप्रकरणी लागू होते. तसेच, १५६ कलम ही रेल्वे समोर दगड किंवा झाडे टाकून तिला अडवण्याप्रकरणी लावली जाते. या दोन्ही कलमांचे उल्लंघन केले नसतानाही आमच्याविरुद्ध या कलमा लावण्यात आल्या. सरकार आमच्यावर सूडबुद्धीने वागत असून त्यामुळेच आम्हाला अटक करण्यात आल्याचे देशपांडे म्हणाले.
हेही वाचा- ठाण्यात अंडी झाली महाग; पाहा नवीन दरवाढ...