नवी मुंबई - पिंपरी चिंचवड प्रमाणे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात देखील समान काम समान वेतन लागू करण्याची मागणी इंटक या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिला आहे.
महापालिका क्षेत्रात 60 हजारांपेक्षा अधिक कंत्राटी कामगार
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 60 हजारपेक्षा अधिक कंत्राटी कामगार आहेत, एनएमटीमध्येही 845 कर्मचारी मानधनावर काम करतात, तसेच अनेक शिक्षक देखील मानधनावरच काम करत आहेत.
नवी मुंबईतही समान काम, समान वेतन संकल्पना राबवा
पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी समान काम समान वेतन लागू केले आहे. त्यांना जर शक्य आहे तर नवी मुंबईत समान काम समान वेतन ही संकल्पना सहज शक्य आहे. त्यामुळे नवी मुंबईत देखील समान काम समान वेतन ही संकल्पना राबवण्यात यावी अशी मागणी इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.